शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपची नवी खेळी?

Updated: May 14, 2018, 05:37 PM IST

मुंबई : मनसेतून फुटून शिवसेनेत आलेल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याबाबतची सुनावणी आज पुन्हा एकदा लांबणीवर पडलीय. कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्यासमोर ही सुनावणी होणार होती. मात्र, पाटील रजेवर गेल्यानं ही सुनावणी तिसऱ्यांदा पुढं ढकलण्यात आलीय.

पालघर लोकसभा पोटनिवडणुसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नेमकी याचदिवशी शिवसेनेत आलेल्या या नगरसेवकांची सुनावणी होती.

पालघरमध्ये शिवसेनेनं माघार घ्यावी, यासाठी भाजपची ही राजकीय दबावाची खेळी असल्याचं मानलं जात होतं. कोकण विभागीय आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या हातातलं बाहुलं असून, अशाप्रकारे कोकण आयुक्तांचा वापर करणं हे लोकशाहीचा खून करण्यासारखं आहे, असा भडीमार मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय. 

तर हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. यामुळं शिवसेना पालघरचा उमेदवारी अजिबात मागे घेणार नाही, असं शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.