आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? अमित ठाकरे देणार आदित्य ठाकरेंना टक्कर?

महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत

BGR | Updated: Oct 15, 2022, 01:55 PM IST
आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? अमित ठाकरे  देणार आदित्य ठाकरेंना टक्कर? title=

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील (Thackeray Family) आणखी एक ठाकरे  राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भविष्यात निवडणूक (Election) लढवू शकतात असे संकेत दिले आहेत. गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. याआधी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता लागली आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेचे (MNS Vidyarthi Sena) अध्यक्ष अमित ठाकरे चांगलेच सक्रिय झाले असून सध्या ते राज्यव्यापी दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये सगळ्यात आधी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेले होते. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकली देखील. त्यानंतर आता आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.

अमित ठाकरे काय म्हणाले
अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या आणखी काही वक्तव्यांनी राजकीय निरीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात उतरलो नसतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. आताची राजकीय परिस्थिती बघून राजकारणात येण्याची इच्छाच झाली नसती. सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. याशिवाय शिवसेनेतले दोन गट आणि भाजपच्या राजकारणात मनसेला संधी असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करुन दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत

अमित ठाकरे यांचा प्रवास

- जानेवारी 2020 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

- राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अमित ठाकरे यांचा वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग

- अमित ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशानंतर त्यांच्याकडे नेतेपदाची जबाबदारी 

- 27 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती

ठाकरे कुटुंबीयांमध्ये सगळ्यात आधी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेले होते. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकली देखील. त्यानंतर आता आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.