'कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा', मनसेची मागणी

कंगना रानौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं.

Updated: Sep 4, 2020, 06:22 PM IST
'कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा', मनसेची मागणी title=

मुंबई : कंगना रानौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. मनसेनेही या वादात आता उडी घेतली आहे. कंगनाची मुंबईबद्दलची टीका बकवास असल्याचं म्हणत मनसेने तिचा निषेध केला आहे. 

मुंबई पोलिसांनी कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. सतत प्रकाश झोतात राहण्याचा विकृत रोह कंगनाला जडला आहे. मुंबईवर मोठे झालात, करोडो रुपये कमावले आणि मुंबईवर टीका करताना लाज वाटली पाहिजे, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत. 

कंगनाने बकवास बंद केला नाही, तर मनसेच्या महिला कार्यकर्त्या तिला धडा शिकवतील, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. दुसरीकडे शिवसेनाही कंगनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीने कंगनाच्या फोटोला जोडे मारत तिचा निषेध व्यक्त केला. 

संजय राऊत यांनी मला पुन्हा मुंबईत येऊ नको अशी धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते. आता मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असा सवाल कंगनाने उपस्थित केला. यावरुन कंगनावर बॉलीवूड, मराठी इंडस्ट्री आणि राजकीय नेत्यांपासून सगळ्यांनी टीका केली. 

दुसरीकडे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे. 'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

दरम्यान कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.