मुंबई: राज्यात महाविकासआघाडीच्या सरकारची स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष मतदारांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी झपाट्याने कामाला लागले आहेत. मात्र, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्तीसाठी सरकारकडून तितक्याशा वेगाने हालचाली होत नसल्याची नाराजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.
...तर सरकारमधून बाहेर पडणार- अशोक चव्हाण
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील मतदारदेखील सरकारच्या कामाचे आणि निर्णयांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्तीसाठी वेगाने कामाला लागावे. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असे मिलिंद देवरा यांनी पत्रात म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी मुंबईमधील रॅलीत भाषण करताना मी दिलेल्या सल्ल्यानंतर गरिबांना ५०० स्क्वेअर फूट घर देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर हा मुद्दा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आल्याची आठवणही देवरा यांनी पत्रातून करून दिली आहे.
'आपल्या सामर्थ्याच्या भीतीमुळे एकमेकांचे चेहरे न पाहणारे एकत्र आले'
गेल्या काही दिवसांत शिवसेनेकडून नाईट लाईफ आणि दहा रुपयांत थाळी या दोन आश्वासनांच्या पूर्तीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेती आणि ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे.