Mhada Lottery Mumbai 2023 : म्हाडाच्या (Mhada Lottery) मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते सोमवारी सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (YB Center) दुपारी 2 वाजता सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीत तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जदार सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्याने सोडत सोहळ्याची तारीख जाहीर होत नव्हती. त्यामुळे या सोडतीचा निकाल रखडला होता. मात्र गेल्या आठवड्यात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी 14 ऑगस्टला सोडत जाहीर करण्याची घोषणा केली होती.
तब्बल चार वर्षांनी मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याने यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला होता. 4,082 घरांसाठी तब्बल एक लाख 20 हजार 144 जणांनी अर्ज केला होता. त्याची सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही सोडत निघणार आहे. दुपारी 2 वाजता सोडतीचा आरंभ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही आहेत. त्यामुळे या सोडतीकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागलं आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आता वाटप प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सज्ज आहे. घरांच्या सोडतीनंतर विजेत्यांना कागदी प्रक्रियेसाठी बँकांमध्ये कुठेही भटकावं लागणार नाही. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क जमा करण्यासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता आता एकल खिडकी योजनेच्या धर्तीवर म्हाडा आपल्या मुख्यालयात सर्व प्रक्रिया पार पाडण्याची व्यवस्था करत आहे.
कोरोना महामारीनंतर कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी नोंदणी विभागाने ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. या उपक्रमानंतर, लोक बिल्डरच्या कार्यालयात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क ऑनलाइन भरत आहेत. चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हाडाने आता नागरिकांच्या सोयीसाठी ई-नोंदणी योजनेवर काम सुरू केले आहे. दरवर्षी म्हाडाच्या कोणत्या ना कोणत्या मंडळाच्या घरांची लॉटरी निघते. प्रदीर्घ प्रक्रियेमुळे म्हाडालाही लोकांची अडचण झाली. त्यामुळे यंदापासून लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.