Mumbai Megablock Update: पश्चिम रेल्वेवर 28 ऑगस्टपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक सुरू आहे. शनिवारी व रविवारी मात्र 10 तासांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचसाठी शनिवारी - रविवारी 10 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local Train Update)
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ८ दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
याशिवाय चर्चगेट – बोरिवली धीम्या लोकल गोरेगाव स्थानकांवरून अंशतः करून पूर्ववत करण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अंदाजे १० ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द आणि काही अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मेगाब्लॉकच्या कालावधीतच्या ५ व्या, १२ व्या, १६ व्या, २३ व्या आणि ३० व्या दिवशी पाच महत्त्वाचे १० तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सुमारे १०० ते १४० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर, ४० लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. ३५ दिवसांच्या मोठ्या ब्लॉक कालावधीत कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द करणे अपेक्षित आहे. तसेच आठवड्यातील शेवटच्या दिवशी ५ ते ६ दिवसांच्या ब्लॉकमध्ये सुमारे ८० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ७० लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.