मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही

Mumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 3, 2024, 07:37 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही title=
Mega Block On Sunday Mumbai Local Train Services To Be Affected On Central and harbour Line

Mumbai Local Train Update: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक नीट तपासून पाहा. रविवारी 4 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. विविध कामांसाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही सकाळी 11 चे 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळं उद्या लोकल प्रवास करताना मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे. 

मेगा ब्लॉकच्या काळात वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्ग बंद राहणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर- पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी-बेलापूर- पनवेल येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रे गोरेगाव सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वांद्रे  गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

मध्य रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक

माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार येथे लोकलला थांबा नसणार आहे.

पश्चिम रेल्वेवर आज कुठे मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वेवर आज वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत विरार वसई रोड ते बोरीवली ते गोरेगावदरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळं काही लोकल रद्द असतील. रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसणार आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.