स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात (Public Toilet) जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून व्हिडिओ चित्रित (Video Shooting) करण्याची संतापजनक प्रकार नागरिकांनी उघड केला आहे. याप्रकरणी एका विकृत तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. विशेष म्हणजे हा तरुण वकिलीचं शिक्षण घेतोय. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. राजस राणे असं या तरुणाचं नाव असून एनआरआय पोलिसांनी (NRI Police Station) त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने ज्या मोबाईलवरुन शौचालयातील महिलांचे चित्रीकरण केले, तो मोबाईल फोनही पोलिसांनी जफ्त केला आहे. ही धक्कादायक घटना सीबीडी बेलापुर इथल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
अशी समोर आली घटना
तक्रारदार महिला बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या कारने पतीसह मुंबईहून उलवेला जात होती. महिलेला वॉशरुमला जायचं असल्याने तीने कार थांबवण्यास सांगितलं. सीबीडीतल्या किल्ले जंक्शन इथल्या नवी मुंबई महानगरापलिकेच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या सार्वजनिक शौचालयात ती गेली. शौचालयात गेल्यावर तिला मोबाईलच्या लाईटचा उजेड दिसला म्हणून तीने छताकडे पाहिलं आणि तिला धक्काच बसला.
बाजूच्या शौचालयातून एक तरुण छतावरुन मोबाईलमधून व्हिडिओ शुटिंग करत असल्याचं तिला दिसलं, त्यामुळे महिला घाबरली आणि तिने आरडाओरडा करत शौचालयाच्या बाहेर पळ काढला. याबाबतची माहिती तीने आपल्या पतीला दिली. महिलेचा आरडाओरडा ऐकून आसपासचे नागरिकही तिथे जमा झाले. महिला, तिचा पती आणि काही लोकं त्या शौचालयाजवळ गेले तेव्हा त्यांना शौचालयाचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. लोकांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तब्बल 10 मिनिटांनंतर शौचालयातून राजस राणे हा तरुण बाहेर आला.
लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विकृत तरुणाला ताब्यात घेतलं. राजस राणेचा मोबाईल तपासला असता पोलिसांना धक्काच बसला. त्याच्या मोबाईलमध्ये त्याच शौचालयातील आणकी एका महिलचा व्हिडिओ आढळला. महिलेच्या तक्रारीवरुन राजस राणे या आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने याआधीही असे प्रकार केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.