मुंबई : नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला विरोध कऱण्यासाठी आज मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना मोर्चात सहभागी होण्याची शक्यता नाही. कायदा संसदेत संमत होत असतानाही शिवसेनेची लोकसभा आणि राज्यसभेत दुटप्पी भूमिका होती. आज होणाऱ्या मोर्चात अनेक सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.
या मोर्चात फरहान अख्तर, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, कुणाल कामरा, अनुभव सिन्हा ही मंडळीही सहभागी होणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. काळे टिशर्ट आणि लाल रिबीन बांधून टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारीही केली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळं देशात झालेलं हिंसाचार प्रकरण हाताबाहेर जात असून राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ईशान्येकडील हिंसाचार आणि त्याचे दिल्लीसह देशभर उमटलेल्या पडसादाबाबत माहिती दिली. शिवाय सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. पोलीस आंदोलकांशी अतिशय क्रूर पद्धतीनं वागत असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हा कायदा लागू करताना मोदी सरकार लोकांचा आवाज दाबू पाहत असल्याचाही आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे.