'आजचा दिवस ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता केली' मुख्यमंत्री शिंदे

Maratha Reservation : सभागृहात मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 20, 2024, 01:58 PM IST
'आजचा दिवस ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता केली' मुख्यमंत्री शिंदे title=

Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) मांडण्यात आलं. या विधेयकात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत हे विधेयक मांडण्यात आलं. दोन्ही सभागृहात या विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) आपलं  म्हणणं मांडलं. आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणार आहे. मराठा बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या एकजुटीचा विजय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

मी आज अभिमानाने सांगतोय की पाऊणे दोन वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारने ठरवले होते त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत, मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजासाठी ठोस करून दाखविण्याची संधी मिळाली. हे मी माझं अहोभाग्य समजतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आजचा दिवस अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले 150 दिवस अहोरात्र मेहनत घेत होते असं त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत हे मराठा आरक्षण दिलं आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात गैरसमज आहे तो त्यांनी दूर करायला हवा, सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यांचा आढावा घेऊन राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकून राहावं म्हणून राज्य सरकार विरोधी पक्षाला सोबत घेऊन शक्य ते सगळे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्र्यांचं निवेदन
मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. मराठा समाजाला जे आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे. आनंद आणि अभिमान आहे. ओबीसी आरक्षणाला आपण कोणताही धक्का लावलेला नाही. मला फक्त एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी आपल्या भाषणात सांगितलं. मराठा बांधवांनी आजवर अनेकदा आंदोलन केलं. पण संयम कधी सुटला नाही. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेक्षणिक सवलती, आर्थिक मदत ही व्यवस्था आपण आधी केली होती. मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं आवश्यक होतं. आमचा सगळ्यांचा तोच प्रयत्न होता, आज या प्रयत्नांना यश आल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

22 राज्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात आपल्याला अधिकार दिले आहेत. त्यामुळे हा कायदा निकषांवर टिकेल. याबाबतीत आपण शंका बाळगण्याचं कारण नाही, ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना सगळ्यांची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.  

'सुप्रीम कोर्टात टिकणार आरक्षण'
सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशनवर आता सुनावणी सुरु झाली असून राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे.सुप्रीम कोर्टात यश मिळेल असा विश्वास आहे, मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर कौन्सिलची फौज उभी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.