मुंबई : मराठा आरक्षण पाच घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाजासाठी हा काळा दिवस आहे, मराठा समाजाच्या आयुष्यात, इतिहासात आजचा दिवस हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आजच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम झाला. भाजप सरकारने मराठा आरक्षण सर्व प्रक्रिया पार करत राज्यात लागू केलं. महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारला बाजू मांडता आली नाही. आता खंडपिठाकडे हे प्रकरण गेलं आहे, पण त्याबद्दल निकाल कधी लागेल हे सांगता येत नाही, मराठा समाजाच्या तरुण-तरुणींच्या आयुष्यात अंधार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
18 ते 20 राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण लागू आहे आणि तिथे स्थगिती नाही, मग महाराष्ट्रात मराठा आरक्षणबाबत हे का झालं नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. पाच खंडपिठाचा निर्णय लागेपर्यंत स्थगिती असणार आहे. महाभकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं. महाभकास आघाडी याबाबत गंभीर नव्हती, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार कोणी ज्येष्ठ नेत्यांनी यांनी यामध्ये लक्ष घातलं नसल्याचं, चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच आरक्षण प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातल्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेस आणि नोकरी भरतीत मराठा आरक्षणाचा उपयोग करण्यात येऊ नये असं कोर्टाने म्हटलं आहे.
कंगना प्रकरणी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, ते लांडग्यांसारखे कंगनाच्या मागे लागले असल्याचं म्हणलंय. कायद्याने कारवाई करा, अशाप्रकारची दादागिरी चालणार नाही, असंही ते म्हणाले.