आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 11, 2023, 03:25 PM IST
आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही  title=

Maratha Reservation : मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार आहे असं सांगत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहिल असा इशारा दिलाय. सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं ठेऊ नका असं आवाहनदेखील त्यांनी सरकारला केलं. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. त्यांनी वैद्यकीय मदत घेण्यासही नकार दिलाय. 

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे. कोर्टात मराठा आरक्षण टिकेल असं आरक्षण देऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekant Shinde) यांनी दिलीय. तर आरक्षणाच्या मागण्यांचा एकत्रित विचार करत असून, ओबीसी (OBC) समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं.

सरकारची सर्वपक्षीय बैठक
आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. आरक्षणाबाबत सत्ताधारींसह विरोधी पक्षांचीही मतं जाणून घेतली जाणार आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन, कुणबी समाजाचा मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यास असलेला विरोध तसंच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास असलेला ओबीसी समाजाचा विरोध या विषयांवर आज सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी 7.30 वाजता चर्चा होणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाकडून जयंत पाटील, राजेश टोपे, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, थोरात, वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत..

मराठा आरक्षणावरुन टीका
मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारवर निशाणा साधलाय. सरकार G-20त जाऊन पार्ट्या झोडलीय. त्यापेक्षा सरकारने जालन्यात जावं, जरांगे पाटलांवर ही परिस्थिती सरकारमुळे आल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर सरसकट आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल, त्यामुळे परमनंट सोलुशन काढण्यासाठी सरकारला वेळ द्यावा असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत शिंदे, फडणवीस, अजित पवारांना सवाल विचारलाय...2014 साली मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावर फसवून सत्ता भोगली... समाजाची फसवणूक केली... टिकाऊ आरक्षण देता येत नव्हतं म्हणून तकलादू आरक्षण दिलं... आरक्षण हायकोर्टात टिकलं मग सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? असा सवाल वडेट्टीवारांनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांना विचारलाय...

चक्काजामचा इशारा
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं मराठवाडा चक्काजामचा इशारा देण्यात आलाय. मनोज जरांगे-पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये बदल करण्यात आले नाहीत तर 16 तारखेपासून मराठवाडा चक्काजामचा इशारा देण्यात आलाय. मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस आहे. तरीही शासनाकडून सुधारित जीआर काढण्यात वेळकाढूपणा केला जात नाहीये, त्यामुळे चक्काजामचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय..