कधी नोटा उधळल्या, तर कधी कार पेटवली... सदावर्तेंच्या कारची तोडफोड करणारे मंगेश साबळे आहेत कोण?

Maratha Reservation : मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.  तर तोडफोडीचं समर्थन करणार नाही असं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. जरांगेंना तातडीनं अटक न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा सदावर्तेंनी दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 26, 2023, 02:50 PM IST
कधी नोटा उधळल्या, तर कधी कार पेटवली... सदावर्तेंच्या कारची तोडफोड करणारे मंगेश साबळे आहेत कोण? title=

Maratha Reservation : 26 ऑक्टोबरची सकाळ उजाडली तीच एका मोठ्या बातमीने.  मुंबईत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची बातमी आली आणि सगळीकडे खळबळ उडाली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) तरुणांनी मुंबईतील सदावर्ते राहात असलेल्या क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. मंगेश साबळे (Mangesh Sable), वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरुन ही तोडफोड केल्याची चर्चा आहे.

कोण आहे मंगेश साबळे
गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. यापैकी एक आहे मंगेश साबळे. मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर चर्चेत असतात. याआधी सप्टेंबरमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत स्वतःच्या गाडीवर पेट्रोल टाकून मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला होता...साबळे हे वेगवेगळे आंदोलन करून नागरिकांचं लक्ष वेधून घेत असतात. मार्चमध्ये संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समितीतील लाचखोरी प्रकरणी जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं...थेट दोन लाख रुपयांच्या नोटाच उधळून लाचखोरीचा निषेध केला होता.

साबळेंनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं
वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करत  पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. मंगेश साबळे सर्वात आधी चर्चेत आले फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळल्याने. विहिरीसाठी बिडीओ पैसे मागत असल्याचा आरोप करत मगेश साबळे यांनी तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा समितीसमोर उधळल्या. हे आंदोलन चांगलंच गाजलं, याची दखल घेत बीडीओंना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर जालन्यातल्या अंतरवली सराटीत पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्त साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यात आपली नवी कोरी कार पेटवून दिली होती. यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या होत्या.

हे ही वाचा : गेल्या काही दिवसापासून 'तो' फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि...

गुणरत्ने सदावर्ते आक्रमक
गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय. मनोज जरांगेंना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी सदावर्तेंनी केलीय. पोलिसांवरील झालेला हल्ला माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलाय. माझ्या घराची रेकी करण्यात आली. हीच का शांततामय आंदोलनाची व्याख्या असा सवाल सदावर्तेंनी विचारलाय. सरकारने जरांगेंचे लाड करणं बंद करावं, नाहीतर मी सुद्धा प्राणांतिक उपोषण करेन असा इशाराही सदावर्तेंनी दिलाय. तर सदावर्तेंची गाडी फोडणा-यांचं समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय. मात्र मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, यांचं षडयंत्र मराठा समाज उधळून लावणार असं जरांगेंनी म्हटलंय.