सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा, 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Updated: Jul 5, 2021, 04:45 PM IST
सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा, 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल title=

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा (Maratha Akrosh Morcha) प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आक्रोश मोर्चा काढल्यानं सोलापूरच्या फौजदारी चावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मोर्चाचे समनव्यक किरण पवार, राम जाधव यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पाटील, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजित निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह 46 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

मराठा आरक्षणासाठी सोलापुरात मोर्चा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले होते. मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती. पण मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला. ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढणार

मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा दाखल करू नका, गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं होतं. मराठा मोर्चाला जाणून बुजून सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याचा आरोप करत पुढील मोर्चा न सांगता काढू असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.