मुंबई: अंधेरीतील कामगार रुग्णालयात भीषण आग लागली असून बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर चौथ्या मजल्यावरील रुग्णांमध्ये एकच घबराट पसरली. अनेक रुग्णांनी वाचण्यासाठी खिडक्यांच्या दिशेने धाव घेतली. अनेक रुग्ण खिडकीत बसून मदतीसाठी धावा करताना दिसत होते. काही रुग्णांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांना फ्रॅक्चरही झाले आहे. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर अग्निशमन दलाने स्नॉर्केल शिडी आणून रुग्णांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे. हे बचावकार्य अजूनही सुरु असून आतापर्यंत जवळपास ४७ जणांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आले आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या आगीमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणेच्या फोलपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Mumbai: 1 person has died in the fire that broke out at ESIC Kamgar Hospital in Andheri earlier today. 47 persons rescued till now. Further rescue operation underway. 10 fire tenders conducting firefighting operations. 1 Rescue van, 16 ambulances also present pic.twitter.com/pknta0DH4l
— ANI (@ANI) December 17, 2018
अंधेरी मरोळ भागात तळ अधिक पाच मजल्यांचे कामगार रुग्णालय असून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. आगीबाबत पावणेपाचच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने ७ बंब, रेस्क्यू व्हॅन व अन्य सामग्रीसह अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. सध्या अग्निशमन दलाकडून अजूनही कर्मचारी आणि रुग्णांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या जखमींना कूपर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. तसेच पालिका व खासगी रुग्णालयांना सतर्क करण्यात आले आहे.