एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय

मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 1, 2017, 04:04 PM IST
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय title=

नवी दिल्ली: शुक्रवारी मुंबईतील एलफिन्स्टन रोडवरील फूटओव्हर ब्रिज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सरकारला धारेवर धरले जात आहे. यानंतर आता रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. हा निर्णय देशातील सर्व रेल्वे स्थानकांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

हे आहेत महत्त्वाचे निर्णय

१)फूट ओव्हर ब्रिज (एफओबी), प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्म एन्डवरील मार्ग सुरक्षा ही प्राथमिकता असणार आहे. यासाठी कोणतेही बजेट प्रतिबंध होणार नाही.

२)पुढील १८ महिन्यांत, जनरल मॅनेजर्सला सुरक्षा अडचणींसाठी अर्थसंकल्प निर्धारित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी, वित्त आयुक्तांना एका आठवड्यात तरतूद मंजुरीसाठी सूचना देऊन १५ दिवसात त्यांना उत्तर द्यावे लागेल.

३)मुंबईच्याउपनगरीय स्टेशन आणि इतर गर्दी असलेल्या स्थानांवर अतिरिक्त एसकेलेटर मंजूर करण्यात आले आहेत.

४) मुख्यालयात बसून २०० अधिकाऱ्यांना आता फील्डवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत काम करावे लागणार आहे.यामूळे ग्राऊंड लेव्हलच्या प्रकल्पांना वेग येणार आहे.

५) देशातील ७५ रेल्वे स्थानकांवर गतिशील स्टेशन निर्देशक नेमण्यात येणार आहेत.
मुंबईतील सर्व स्थानिक गाड्यांची सुरक्षा आणि कडक सुरक्षेसाठी १५ महिन्यांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. हे काम देशभरात एकाचवेळी केले जाणार आहे.

६) खूप दिवसांपासून अडकलेले कल्याण यार्ड रीमॉडलिंगचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.

७) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि लालफितीत कारभार अडकू नये यासाठी व्यवस्थापकांना अधिकार देण्यात आले आहेत.