दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाची शपथ घेतली, पण अजूनही नव्या मंत्र्यांचं खातेवाटप रखडलेलं आहे. आज खातेवाटपाबाबत शिक्कामोर्तब होईल, असं सांगण्यात येत होतं, पण आजही खातेवाटप झालेलं नाही. जादा खात्यासाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलेलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खातेवाटपासंदर्भात काल साडेचार तासांची बैठक झाली पण या बैठकीत तोडगा निघाला नाही. यानंतर आज पुन्हा तिन्ही पक्षांची बैठक सुरु आहे. सुरुवातीला शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही बैठकीला पोहोचले आहेत.
महाविकासआघाडीच्या नेत्यांची खातेवाटपची चर्चा आज संपेल आणि उद्या यादी अंतिम करण्यात येईल. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप करण्यात येईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पहिल्या खातेवाटात शिवसेनेकडे २४, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसकडे ११ खाती गेली आहेत. ग्रामीण भागाशी निगडीत असलेले कृषी खाते हे ज्येष्ठ आणि विश्वासू अशा सुभाष देसाई यांच्याकडं सोपवले जाण्याचे संकेत सामना या वृत्तपत्रातून दिलेत पण काँग्रेसला शिवसेनेच्या ताब्यातलं कृषी किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यातलं ग्रामविकास खातं हवंय.