Maharastra Politics Over Loksabha Election : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या गुढीपाडवा (MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava) मेळाव्यात प्रतिकात्मक राजकारण केल्याचं दिसून आलंय. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना समर्थन देत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी समन्वयक भूमिका घेतली असली तरी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभेसाठी तयारीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या भूमिकेवर विरोधक नाराज असल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेससह शरद पवार गट आणि शिवसेनेने देखील राज ठाकरे यांच्या स्विकारलेल्या भूमिकेवर निराशा व्यक्त करत टीका केली आहे.
रोहित पवारांची म्हणतात 'स्वायत्तता गमावली'
तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर मोदींना 'राज'मान्यता पण, व्याभिचाराला नाही, राज ठाकरे यांच्या या वाक्याचा अर्थबोध झाला नाही; कार्यकर्त्यांनाही हे समजलेले नाही. मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही, असे म्हणणे म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही, असा तर अर्थ नाही ना? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे. समाधानकारक तोडगा निघाला नाही म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले. पाठिंबा द्यायचा होता तर दिल्ली वारी करण्याची गरज काय पडली होती?, असा सवाल अंबादास दावने यांनी विचारला आहे.
वाघाची शेळी झाली - विजय वडेट्टीवार
राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. आज वाघाची शेळी झाली आहे. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे म्हणतात...
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महायुतीला दिलेल्या पाठींब्याचे मी मनापासून स्वागत करतो आणि राज ठाकरे यांना धन्यवाद देखील देतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला धरुन आज राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या विकासित भारत संकल्पनेला दिलेला हा पाठींबा आहे. उद्धव ठाकरे यांची सेना हिंदुत्वाला आणि राम मंदिराला विरोध करणार्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत गेली असताना मनसेचा महायुतीला पाठींबा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा आहे, असे मी समजतो, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.