'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले

Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 22, 2024, 04:28 PM IST
'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले title=

Viral Post : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. एका कवितेच्या ओळीत 'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर' असं लिहिण्यात आलं आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा असं मत व्यक्त केलं जात आहे. पहिल्या पुस्तकात 'जंगलात ठरली मैफल' अशी कविता आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळीत इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत बालभारतीची पुस्तकं प्रकाशित करते. पण इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकात वापरलेल्या इंग्रजी शब्दामुळे हे पुस्तक चर्चेत आहे. यावर सोशल मीडियामध्येही संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषा पुस्तकात मराठी शब्द का नाहीत असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे.

काय आहे पुस्तकातील कविता

जंगलात ठरली मैफल
'जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल 
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ 
वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर 
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस 
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां 
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर 
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !

संदीप जोशी यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं 'हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिली चे पुस्तक. कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे वन्स मोर वन्स मोर झाला शोर.. किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का? तुमचे मत काय?'

संदीप शिंदे यांच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या युजर्सने म्हटलंय 'माऊस आणि शोर हे तरी काय मराठी शब्द आहेत काय.. याबद्दल बालभारती च्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन आपण तक्रार नोंदवू शकतो ज्याची दखल घेतली जाते. मी सुद्धा बालभारती च्या पाठ्य पुस्तक मंडळात लेखक म्हणून काम केले आहे त्यावरून सांगते' तर एका युजरने म्हटलंय 'मला देखील ही कविता वर्गात शिकवताना अतिशय वाईट वाटले होते मी देखील जिल्हा परिषदला एक शिक्षिका आहे. पण आजकाल बालभारतीच्या पुस्तकातील कविता अतिशय हलक्या दर्जाच्या असतात, आमच्या वेळी ज्या प्रकारे कविता सुंदर आणि प्रसिद्ध महान कवींच्या असायच्या तशा आजकाल पाहायला नाही भेटत अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी काहीही कविता लिहून घेतल्या जातात आणि त्या आम्हाला शिकवावे लागतात काय करावे' असं म्हटलंय.  निदान पुस्तकात तरी मराठीचा मान ठेवा. शक्यतो मराठीच शब्द वापरावेत, अशी मागणी एका युजरने केली आहे.