गरीब आणि गरजूंसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, या योजनेला पुन्हा मुदतवाढ

 महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) आता पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली आहे.

Updated: Jun 18, 2021, 08:07 PM IST
गरीब आणि गरजूंसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, या योजनेला पुन्हा मुदतवाढ title=

मुंबई  :  राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असला तरी निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) घेतला आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. तसेच कोरोना काळात गरिब आणि गरजू लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने (Maharashtra Government) मोफत शिवभोजन थाळीची ( free Shiv Bhojan Thali scheme ) घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात मोफत शिवभोजन थाळी योजना सुरु केली. आता पुन्हा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 441 नवीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या 44,300 ने वाढली आहे. राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या 441 केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.

‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब आणि गरजू जनतेसाठी  मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. भुजबळ यांनी पाठवलेल्या मोफत थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने 17 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 15 एप्रिल ते 17 जून या काळात 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.  आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी 70 लाख 18 हजार 184 थाळ्यांचे वितरण झाले आहे.