राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध! राठोड यांचं कमबॅक तर 'या' नेत्यालाही मिळणार संधी?

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा वनमंत्री पद मिळणार? 

Updated: Jul 11, 2021, 07:21 PM IST
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध! राठोड यांचं कमबॅक तर 'या' नेत्यालाही मिळणार संधी? title=

मुंबई : केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. राज्य मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यात दोन नेत्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. 

संजय राठोड कमबॅक करणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावे लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड यांना राज्यमंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचं  बोललं जात आहे. संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असं सूचक विधान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलं. त्यामुळे संजय राठोड हे पुन्हा मंत्री होणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपने दिला आंदोलनाचा इशारा

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनमंत्री पद अद्यापही रिकामंच आहे. राठोड यांचं मंत्रिमंडळात कमबॅक झाल्यास त्यांना पुन्हा वनमंत्रीपद दिलं जाणार का याबाबतही चर्चा रंगतेय. दरम्यान, संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजन नेते चंद्रकांत पाटाली यांना राज्य शासनाला दिला आहे.

प्रणिती शिंदे यांना मिळणार संधी?

काँग्रेसच्या आमदार प्रणिती यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे तसंच प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीची हॅट्ट्रिक, त्यांची सोलापुरातील लोकप्रियता पाहता, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल, याबाबत कार्यकर्त्यांनाही आशा आहे असं ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत म्हटल होतं.