OMICRON VARIANT : शाळांसंदर्भात मोठी बातमी! पाहा तुमच्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार का?

राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता

Updated: Nov 30, 2021, 04:40 PM IST
OMICRON VARIANT : शाळांसंदर्भात मोठी बातमी! पाहा तुमच्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार का? title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शाळा बंद आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यादृष्टीने अनेक जिल्ह्यात तयारीही करण्यात आली होती.

पण नव्या विषाणूने पुन्हा चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सध्या भारतात धोका नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचं चित्र आहे. 

मुंबई 
स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने उद्यापासून शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. आता शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महानगर पालिकेनं घेतला आहे. मुंबईत एकूण 7221 शाळा आहेत. तर एकूण विद्यार्थी संख्या 21 लाख 42 हजार इतकी आहे.

पुणे
मुंबई महानगर पालिकेप्रमाणेच पुणे महानगर पालिकेने देखील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील पालक संघटनांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असं पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. 

पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड मधीलही शाळा बंदच उद्यापासून सुरु होणार नाहीत. 15 डिसेंबर पर्यंत 1 ते 7 वी पर्यंतच्या शाळा बंदच राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

नाशिक
नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतील शाळाही उद्यापासून म्हणजे 1 डिसेंबरपासून सुरु होणार नाहीत. 10 डिसेंबरपर्यंत शाळा सुरु करण्यासंदर्भातला निर्णय स्थगित करण्यात आल्याचं नाशिक मनपा प्रशासनाने सांगितलं आहे.

मालेगाव
मालेगावमध्येही पहिली ते चौथी शाळा 10 डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी तातडीने महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. मालेगाव हे व्यावसायिक शहर असल्याने मोठ्या प्रमाणावर माळेगावमध्ये बाहेरगाववरून लोक येतात संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर
कोरोनाचा नवीन व्हेरीयंटचा धोका लक्षात घेता नागपुर शहरातील इयत्ता 1 ते 7 च्या शाळा 10 डिसेंबर पर्यंत सुरु होणार नाहीत. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केली आहे.

औरंगाबाद
औरंगाबादमध्ये ग्रामई भागात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शहरांमधल्या शाळांचा निर्णय पाच डिसेंबरला होणार आहे. 

कोल्हापूर 
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा शासनानं दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून सुरू होणारेत. त्यात कुठलाही बदल होणार नाहीय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शाळांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात देखील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत तयारी केली जातेय. साफसफाई करणं, सॅनिटायझेशन करणे सारख्या गोष्टी आता शाळांकडून केल्या जातायत. दरम्यान, शाळांमधील पटसंख्या पाहत विद्यार्थ्यांच्या वेळेचं नियोजन करण्याचा प्रत्येक शाळेकडून होत आहे. आम्ही शासनाच्या नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांची काळजी घेणार असल्याचं प्रत्येक शाळेचं म्हणणं आहे.

नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका ह्ददीत 1 ते 7 वी शाळा उद्यापासून सुरू होणार नाहीत. 15 तारखेपासून शाळा सुरू करायच्या का याबाबत सायंकाळी बेठक होणार आहे. 

मावळ
मावळमध्ये उद्या पासून शाळेची घंटा वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर मावळमधील शाळांमध्ये लगबग दिसून येत आहे. शाळांमध्ये साफसफाई आणि पूर्वतयारी सुरू आहे. 24 केंद्रातून 274 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज स्वच्छता सुरू करण्यात आली. दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा उद्यापासून खुली होत असल्याने आज शाळांचे सर्व वर्ग, बेंच, फळे स्वच्छ करण्यात आले.

नांदेड
नांदेड जिल्हयात उद्यापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोना नियमांबरोबरच शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. शिवाय पालकांची संमती देखील आवश्यक असणार आहे.