महाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत.  

Updated: Nov 14, 2019, 07:47 PM IST
महाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय title=

 मुंबई : महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत. पहिल्याच बैठकीत किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. लवकर सत्ता स्थापन व्हावी, ही सगळ्यांची मागणी आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र मिळून मसुदा तयार केला आहे. त्याला वरिष्ठ अंतिम स्वरुप देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि समन्वय समितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसची (Congress) मागणी आहे का, यावर ते म्हणालेत तशी काँग्रेसची मागणी नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv sena) नेत्यांची मुंबईत वांद्रे एमईटी येथे पहिली बैठक झाली. महाशिवआघाडीचा मसुदा तयार आहे. मात्र सत्तापदांच्या वाटपाची अजून चर्चा बाकी असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांनी चर्चा केली. या चर्चेचा तपशील हायकमांडला पाठवला जाणार आहे.  

महाशिवआघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेचा वचननामा आणि आघाडीचा जाहीरनामा यातील कोणते मुद्दे किमान समान कार्यक्रमात घ्यायचे, यावर चर्चा सुरू झाली. आता या समुद्याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. त्यानंतर सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आणि सामायिक कार्यक्रम ठरवला गेला आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आता दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती आहे.