Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पेगाससची (Pegasus) एन्ट्री झालीय. पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर वॉच ठेवला जातोय. त्यांचे फोन हॅक केले जातायत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासेंनी केलाय. अलिकडेच आपला फोन हॅक झाल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केला होता. याबाबत गृह खात्यानं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलीय.
केवळ सुप्रिया सुळेच नाहीत, तर महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांवरही पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप होतोय. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत गृह खात्यावर थेट आरोप केले होते. आता पुन्हा एकदा पेगासस चर्चेत आलंय. हे पेगासस प्रकरण काय आहे, ते पाहूया.
पुन्हा पेगासस?
2022 मध्ये सर्वात पहिल्यांदा पेगासस हेरगिरी प्रकरण उघड झालं. भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअर वापरलं जात असल्याची बातमी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं प्रकाशित केली होती. दहशतवादाला आळा घालण्याच्या नावाखाली भारतानं इस्रायलकडून पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा दावा याच बातमीत होता. पेगासस हे सॉफ्टवेअर इस्रायलच्या NSO या सायबर सुरक्षा कंपनीने तयार केलंय. पेगासस हा प्रोग्रॅम एखाद्या स्मार्टफोनमध्ये घातल्यास हॅकर त्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्स्ट मेसेज आणि लोकेशन आदी सर्व माहिती मिळवू शकतो. नेते, पत्रकार तसंच सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं, असं सांगण्यात येतंय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही पेगाससच्या माध्यमातून सुरू असलेल्या हेरगिरीविरोधात आवाज उठवला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं विशेष तपासणी समितीही बनवलीय. त्या समितीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पेगाससवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्यात.