कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena) उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सातत्याने दिल्ली वाऱ्या करत असल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले असताना उद्धव ठाकरे दिल्लीत इंडी आघाडीच्या बैठकीसाठी जात असल्याचं या व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं आहे.
व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका
उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाने जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला नियोजित दिल्ली दौरा रद्द करून सोमवारी पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून मदत केली. तर उद्धव ठाकरे मात्र मंगळवारपासून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत, असं या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.
पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याऐवजी दिल्लीत मुजरा करणे महत्वाचे, अशा आशयाचे व्यंगचित्र रेखाटून शिवसेना पक्षाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. हे व्यंगचित्र शिवसेना पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलं असून या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
उद्ध ठाकरे दिल्लीत
उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचं दिल्लीत स्वागत केलं. उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक ते घेणारेत. संजय राऊतांच्या निवासस्थानी ही बैठक होणारेय. यावेळी उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शनही करणारेत. तसंच उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतील.
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabah Election 2024) निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करून इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणारेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असणारेत.