शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद

Maharashtra Politics : बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाने महत्त्वाचा युक्तीवाद केला.

आकाश नेटके | Updated: Feb 1, 2024, 09:12 AM IST
शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद title=
(फोटो सौजन्य - ANI)

NCP MLA Disqualification Case : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा ठोकला आहे. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी बुधवारी संपली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. अशातच बुधवारच्या सुनावणीत अजित पवार गटाने राहुल नार्वेकर यांच्याकडे मोठा दावा केला आहे. शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होतील? असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी झाली. या सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी आज महत्त्वाचा युक्तिवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवड पक्ष घटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्या नियुक्त्या निवडणूक न घेताच केल्या होत्या. पक्ष घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यही नसताना ते पक्षाध्यक्ष कसे होऊ शकतात? असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर केला. 

अजित पवार गटाचा युक्तिवाद

"पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणूकच झाली नाही. जर ती झाली असती, तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले असते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्ष शरद पवार होते. राज्य कार्यकारणीची निवडणूक घेण्यात येणार होती. मात्र शरद पवार यांनी निवडणूक न घेताच पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीमध्ये नियुक्त्या केल्या. पक्षाची घटना, विधिमंडळ आणि पक्षातील बहुमत कोणाकडे आहे, या तीन बाबींचा विचार अध्यक्षांनी निर्णय देताना करणे, हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक आहे. शरद पवार यांना विधिमंडळ पक्षातील बहुमत आजपर्यंत सिद्ध करता आलेले नाही. आपण सरकारमध्ये सहभागी व्हायचे नाही, हा निर्णय शरद पवार यांनी एकटयाने कसा घेतला? भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होऊ नये, असे पक्षाच्या घटनेत नाही आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लेखी सूचनाही नाही. उलट शरद पवार यांनीच 2014 मध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अजित पवार गटातील आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने अपात्र ठरू शकत नाहीत," असा युक्तीवाद वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांच्याकडे केला.

दरम्यान, शरद पवार गटातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या युक्तीवाद वकील शरण जगतियानी यांनी केल्यानंतर बुधवारी अजित पवार गटाचे वकील प्रदीप संचेती यांनी पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.