नारायण राणेंवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे, एक फोन आणि राणे शिवसेनेतून बाहेर?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा आमने-सामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरुन दोघांमध्ये सामना रंगला आहे. राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा नेमकं काय घडलं, याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.

Updated: Mar 23, 2023, 09:41 PM IST
नारायण राणेंवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे, एक फोन आणि राणे शिवसेनेतून बाहेर? title=

Raj Thackeray : मुंबईतल्या दादर इथल्या शिवतीर्थावर (Shictirtha) पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट केला. पण राज ठाकरे यांचं मुख्य टार्गेट होतं ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). भाषणाच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोट केला. नारायण राणे (Narayan Rane) बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हा नेमकं काय घडलं, बाळासाहेबांबरोबर फोनवर काय चर्चा झाली याबद्दलचा लेखाजोखाच राज ठाकरे यांनी मांडला. 

'राणेंना पक्ष सोडण्याची इच्छा नव्हती'
शिवसेनेतून नेते कसे बाहेर पडले, याचा इतिहास राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर पुन्हा उगाळला. त्याचवेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेतच थांबण्याबद्दल चर्चा करण्यासाठी नारायण राणे बाळासाहेबांना भेटायला निघाले होते... पण एक फोन आला आणि पुढचा खेळ बिघडला.

नारायण राणेंचं बाहेर पडल्याचं ठरल्यानंतर आपण त्यांना फोन केला आणि त्यांना साहेबांशी बोलतं असं सांगितलं. त्यानंतर बाळासाहेबांना फोन लावला. राणे यांची पक्ष सोडण्याची इच्छा नाही त्यांना जाऊ देऊ नका असं बाळासाहेबांच्या कानावर घातलं. तेव्हा बाळासाहेबांनी लगेचच राणेंना घरी घेऊन या असं सांगितलं. त्यानुसार राणेंना फोन लावला आणि बाळासाहेबांकडे जायचंआहे असं सांगितलं. पण पाचच मिनिटात बाळासाहेबांचा फोन आला आणि राणेंना घेऊन येऊ नकोस असं सांगितलं, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

नितेश राणेंनी सांगितला पार्ट टू
बाळासाहेबांच्या मागून कुणाचा तरी आवाज येत होता, असा राणेंच्या स्टोरीचा पार्ट वन राज ठाकरेंनी सांगितला. तर त्याचाच पार्ट टू नितेश राणेंनी (Nitesh Rane) समोर आणला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना धमकी दिली, राणेंना पुन्हा पक्षात घेतलं तर माझ्या मुलांबाळांबरोबर मी मातोश्री सोडून जाईन, अशी धमकी दिली. त्यानंतर बाळासाहेबांनी ती भूमिका घेतली असा आरोप नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी लगावला टोला
उद्धव ठाकरेंनी मात्र राज ठाकरे १८ वर्षांपासून तीच जुनी टेप वाजवत असल्याचा टोला लगावत थेट राणेंच्या प्रकरणावर बोलण्याचं टाळलं. 

उद्धव यांच्यावरच निशाणा साधत २००५ साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली. त्यानंतर काँग्रेस, भाजप अशी मजल दरमजल करत राणे सध्या केंद्रीय मंत्रिपदावर स्थिरावलेत. राणेंबद्दल गौप्यस्फोट करत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव यांच्यावर निशाणा साधलाय. आता 18 वर्षांपूर्वीच्या इतिहास उकरून उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीला ब्रेक लावण्यात राज ठाकरेंच्या खेळीला किती यश येणार हा खरा सवाल आहे.