'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप, नाना पटोले यांनी दिला इशारा  

Updated: Feb 4, 2023, 07:11 PM IST
'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा title=

Maharashtra Politics : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency election) जिंकून आल्यानंतर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. काँग्रेसमधून कुटुंबाला बाहेर ढकलण्याची स्क्रिप्ट रेडी होती, उमेदवारीसाठी नाशिकऐवजी हेतुपूर्वक औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म देण्यात आला..असा गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केला.  पत्रकार परिषदेत तांबेंनी त्यांना पाठवण्यात आलेले एबी फॉर्म दाखवले.  बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) अडचणीत आणण्यासाठी नियोजनपूर्व कट रचला गेला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मोठ्या भावासारखे आहेत असं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशावर मात्र चुप्पी साधली.. 

नाना पटोले यांचा इशारा
सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपांवर बोलणं नाना पटोलेंनी टाळलं आमचे प्रवक्ते तांबेंना उत्तर देतील, असं पटोलेंनी म्हणत बोलणं टाळलंय. पण त्याचवेळी तुमच्या परिवाराबद्दल आमच्याकडे खूप मसाला आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही द्यायला पटोले विसरले नाहीत. भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने आम्ही संदेश देतोय, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे, पण जे दोन्हीकडे हात ठेवतायत, त्या लोकांवर बोलण्यासाठी आमच्याकडे भरपूर मसाला आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

सत्यजीत तांबेंच्या मुद्द्यावर हायकमांड निर्णय घेतील असं सांगतानाच देशात अनेक प्रश्न आहेत, मीडिया त्याविषयी विचारत नाही अशी आगपाखड पटोले यांनी केली. विखेंबद्दल काही दिवसांनी बोलणार आहे, विखे आता देवेंद्र फडणवीस यांची जागा घ्यायला बघतायत, आता मी बोलणार नाही, नंतर उत्तर दोते, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे. नाशिकमध्ये जो काही सर्वपक्षीय हाय व्होल्टेज झालाय ते सर्वांना माहिती आहे, आमचे प्रवक्ते लवकरच पुरव्यांनिशी माहिती देतील असं नाना पटोले यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही आरोप केला. आमचं घरातलं भांडण होतं. या घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवार यांनी केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

पोटनिवडणूक आघाडी म्हणून लढवणार
एखाद्याला वापरून फेकून देणं ही भाजपची नियत आहे. मुक्ताताई आजारा असताना त्यांना निवडणुकीसाठी बोलावलं, गरज संपली की फेकून देणं असं भाजपचं वागणं असल्याची टीका त्यांनी केली. पुण्यातील 7 उमेदवारांची नावं हायकमांकडे पाठवली आहेत. कसबापेठ पोटनिवडणुकीसाटी उद्या नावं जाहीर होईल, तसंच कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.