अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रीबाबत दादांचे मोठे संकेत

Maharashtra Politics : 31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार आणि 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यातच आता अजित पवारांनीच केलेल्या एका सूचक विधानामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय

राजीव कासले | Updated: Nov 30, 2023, 09:56 PM IST
अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रीबाबत दादांचे मोठे संकेत title=

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)नाराज असल्याच्या बातम्या कधी येतात तर कधी ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतात. आता मात्र खुद्द अजित पवारांनीच केलेल्या एका सूचक विधानामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांनी केलेलं विधान हे मुख्यमंत्रीपदाबाबत असल्याचा कयास बांधला जातोय. कर्जतमधील सभेत अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 'आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल', असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबतचे (Chief Minister) संकेत दिलेयत. यावेळी त्यांनी राज्यातील आरक्षणाचा विषय ते आपल्याला डेंग्यू झाल्यानंतर झालेली टीका अशा सर्वंच विषयांवर भाष्य केलं. तसंच राजकीय परिस्थितीमुळे त्या त्या वेळेला भूमिका घ्यावी लागते असं विधानही त्यांनी केलं.

तुमच्या मनातलं लोकसभेनंतर होईल असं अजित पवार म्हणत असले तरी काही दिवसांपूर्वीच त्यांचे काका शरद पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न असल्याची टीका केली होती. अजित पवारांच्या या सूचक विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही टीका केलीय.  31 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची जागा रिकामी होत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय तर मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करणाऱ्या अजित पवारांचा नंबर कितवा असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. दरम्यान, अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत.

दादा कधीकधी उपमुख्यमंत्री? 

2010-2012 (वित्त, नियोजन, ऊर्जा)

2012-2014 (वित्त, नियोजन, ऊर्जा)

2019 (80 तासांसाठी)

2019-2022 (ठाकरे सरकार)

2022 ते आजपर्यंत (शिंदे सरकार)

शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामुळे अजित पवारांना संधी मिळू शकते असा अंदाज बांधला जात होता. मात्र लोकसभेनंतर घडामोडी घडतील असं सूचक विधान दादांनी केल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय.

सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
दरम्यान, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनील तटकरेंनी भाष्य केलंय. भाजपसोबत जाण्याआधी अजितदादांनी सगळ्यांना विचारणा केली होती. सगळ्यांनीच सह्या केल्या होत्या असं तटकरेंनी म्हटलंय. तर 2017 सालीच राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन झालं असतं असा गौप्यस्फोट अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी केलाय. (8 महिने चर्चा झाल्यानंतर मंत्री, पालकमंत्री, जागा वाटप, खाती, सगळं ठरलं होतं. मात्र, शेवटच्या क्षणी सरकार बनलं नाही. त्या सरकारमध्ये अजितदादा आणि मी सहभागी होणार नव्हतो असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केलाय.