अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका... वाद पेटणार

अब्दुल सत्तार यांनी टीका करताना दिली शिवी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, 24 तासांचा दिला अल्टिमेटम

Updated: Nov 8, 2022, 06:58 PM IST
अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका... वाद पेटणार title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriay Sule) यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. 

अब्दुल सत्तार यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढच्या 24 तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यता आमच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. 

अब्दुल सत्तार काय बोलले?
संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं खासदार श्रीकांत शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेची सर्व तयारी अब्दुल सत्तार बघत आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला.  सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीवर बोलताना गलिच्छ भाषेत अब्दुल सत्तार सारखा लायक नसलेला माणूस बोलत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावर हे सरकार आणलं, त्यांनी हिंदुत्वाची शपथ आहे, आनंद दिघे यांची शपथ आहे, अब्दुल सत्तार यांना कृषिमंत्रीपदावरुन हकललं पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासात माफी मागवी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.