अमोल पेडणेकरसह अमर काणे झी मीडिया, नागपूर : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन (Mahavikas Aghadi) आता शंभर नंबरी वाद सुरु झालाय. महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला (Seat Sharing Formula) असला तरी घटकपक्षांनी शंभर जागांचा दावा करायला सुरुवात केलीय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काँग्रेस 100 किंवा 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचा दावा केलाय. दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपात सेंच्युरी मारणार असल्याचा दावा केलाय. 85 जागा मिळवल्यात 15 जागाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळतील असा दावा त्यांनी केलाय.
जागावाटप 99 टक्के पूर्ण झाले असून घोषणेची केवळ औपचारिकता असे देखील संजय राऊत म्हणाले. आम्हाला सरकार बनवायचं आहे. उद्याचे आम्ही सत्ताधारी आहोत, त्यामुळे तोलून मापून आम्ही जागा वाटप करत आहोत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. यावर 85 जागा लढवून 100 जागा जिंकणार हे गणितच रंजक असल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेनं लगावलाय. महाविकास आघाडीच्या चुकलेल्या गणितावर 85+85+85 ची बेरीज 270 होते हे गणित जयंत पाटलांचं आहे का असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी लगावलाय.
शंभर जागांचा दावा आणि त्यासाठी मांडलं जाणारं गणित हे कठीण दिसतंय. आता हा जागावाटपाचा शंभर नंबरी वाद कसा मिटणार हे पाहणं औसुक्याचं होणार आहे.
मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला
महाविकास आघाडीचं 85 अधिक 85 अधिक 85 बरोबर 270 हे गणित राज्यात चर्चेचा विषय झालाय. तीन पक्षांच्या जागांची गोळाबेरीज 255 होत असताना 270 जागांचं गणित मविआनं मांडलं. जागावाटपाचा हा फॉर्म्युला मांडणारे जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोलेंवर सत्ताधारी महायुतीनं टीकेचा भडीमार केलाय. महाविकास आघाडीच्या निवडणुकीचं गणित ठरलं असलं तरी त्यांची बेरीज वजाबाकी आणि मांडणी मात्र नेत्यांना अजूनही जमलेली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गणित मांडताना मविआचा नेता काही ना काही चूक करत होता.