मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या १५ दिवसानंतरही राज्यात नवीन सरकार स्थापन झालं नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे महायुतीतले संबंध आणखी ताणले गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला असला, तरी सध्या तेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
एकीकडे राज्यात सत्तेचा हा पेच निर्माण झालेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार यावर राज्यातल्या सत्ता स्थापनेचं भवितव्य अवलंबून आहे.
- शिवसेना लगेच सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. कारण यामुळे सत्तापिपासू अशी प्रतिमा निर्माण होण्याची भीती शिवसेनेला आहे.
-नियमानुसार राज्यपाल सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील, याची शिवसेना वाट पाहील. जर भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे आल्यास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीने भाजप सरकार पाडेल.
- यानंतर मग शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकेल.
- या दोन शक्यतांपैकी काहीच न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ येताच, शिवसेना मग वाट न पाहता राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी सत्ता स्थापनेचा दावा दाखल करेल.
- भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येईल, ज्याला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल.