कलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक

राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.

Updated: Jul 11, 2023, 08:34 PM IST
कलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) फडतूस गृहमंत्री म्हणून टीका केली होती. त्याला फडणवीसांनीही जोरदार उत्तर दिलं होतं. आता अशाच वैयक्तिक टीकेचा दुसरा अंक पाहायला मिळतोय आणि तोही फडणवीसांचं होमपीच असणा-या नागपुरातून. उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यात देवेंद्र फडणवीसांवर नागपूरचा कलंक (Kalank) म्हणत खरमरीत टीका केली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

फडणवीसांच्या होमपीचवर येऊन ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनीही तिखट पलटवार केलाय. फडणवीसांनी ठाकरेंवर कोणते कोणते कलंक आहेत याचं लांबलचक ट्विट केलं.. स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला कलंकाची काविळ झाली असेल तर एकदा उपचार करून घ्या उद्धवजी! असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. यासोबत त्यांनी आठ पॉईंटच मांडले आहेत.

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

भाजप आक्रमक
फडणवीसांवर ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर राज्यभरात अख्खी भाजप (BJP) रस्त्यावर उतरली. राष्ट्रवादीसोबतच्या शपथविधीनंतर भाजप नेते काहीसे मौन बाळगून होते. मात्र ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आली. नागपुरात तर उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेची अंत्ययात्राच काढण्यात आली. तर ठाकरेंचे हाडवैरी असणारे भाजप नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका केली. तर दुसरीकडे भाजपकडून इतका प्रखर हल्ला झाल्यानंतरही ठाकरे आपल्या कलंक टीकेवर ठाम आहेत. कंलक या शब्दात लागण्यासारख नाही. तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लावता. आणि त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून बसता. मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का?  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर आधी फडतूस आणि मग कलंकित म्हणत बोचरी टीका केली. त्यानंतर नितेश राणेंकडूनही पातळी सोडून टीका करण्यात आली. टीका-टीपणीच्या नादात राजकारणाचा स्तर घसरतो आहेत मात्र विकासाचे, सर्वसामान्यांचे प्रश्नीही दुर्लक्षित होतायत..