"तसंही शिंदेंना दिलं जाणारं महत्व रुचत नव्हतंच म्हणून..." राजकीय भूकंपावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. या निर्णयावरुन राज ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 2, 2023, 04:02 PM IST
"तसंही शिंदेंना दिलं जाणारं महत्व रुचत नव्हतंच म्हणून..." राजकीय भूकंपावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया title=

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाला वर्ष पूर्ण होत नाही तोच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष देखील फुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. सुरुवातीला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या भूकंपाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?," असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.