'जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत तोपर्यंत' राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा दावा

शिवसेनेतील बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क, शरद पवार यांनी बोलावी पक्षाची बैठक

Updated: Jun 22, 2022, 04:34 PM IST
'जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत तोपर्यंत' राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा दावा title=

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातला संघर्ष प्रचंड टोकाला गेलाय. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेवरच (ShivSena) दावा ठोकलाय. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याचं शिंदे यांनी ट्विट केलंय. 

सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंचीच नियुक्ती करत असल्याचं 34 आमदारांच्या सह्यांचं पत्रही विधीमंडळ आणि राज्यपालांना पाठवण्यात आलंय.  त्यामुळे आता शिवसेनेवर हक्क सांगण्यावरूनच थेट शिंदे आणि मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. 

एकीकडे शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार यांनी आज काही आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठकही घेतली. या बैठकीनंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला. 

हे संकट शिवसेनेवर नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. सर्व आमदारांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावर उद्या पुन्हा राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत आहे. अशा अडचणीच्या काळात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं. 

तसंच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं.  देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे स्वप्न भाजप पाहात आहे, त्याला सुरुंग लागेल, असा आम्हाला विश्वास असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.  जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.