Corona Update : राज्यासह मुंबईत Corona रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, राज्यात Omicron चे २० रुग्ण

मुंबई मनपा अॅक्शनमोडमध्ये, परदेशातून आलेल्या प्रवशांसाठी नियमावली

Updated: Dec 24, 2021, 08:42 PM IST
Corona Update : राज्यासह मुंबईत Corona रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, राज्यात Omicron चे २० रुग्ण title=

Corona in Mumbai : राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला 100 पर्यंत आलेली कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे पार झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाने तब्बल सहाशेचा आकडा पार केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात मुबंईत ६८३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ झाली असून गर्दीमुळे कोरोनाचा आकडा वाढेल अशी भीती वर्तवण्यात आली आहे.

मुंबई मनपा अॅक्शन मोडमध्ये
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दुबईहून येणाऱ्या प्रवांशासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. दुबईतून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईत राहाणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. ७ दिवसांचा होम क्वारंटाईन संपल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घराबाहेर पडता येईल. तसंच मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या पण मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करता येणार नाही. 

राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ
मुंबईबरोबरच राज्यातही कोरोना रुग्णांनी हजारचा आकडा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोनाचे १४१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. आज राज्यात ८६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.६९ टक्के इतका झाला आहे. 

राज्यात ओमायक्रॉनचे २० रुग्ण
कोरोनाबरोबरच राज्यात ओमायक्रॉनचं संकटही वाढत आहे. राज्यात आत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २० नवे रुग्ण आढळले. यापैकी मुंबईत ११ रुग्ण आढळून आले आहेत. तर पुणे ६, सातारा २, आणि अहमदनगरमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.