उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? बहुरंगी मतदारसंघ कोणाला देणार कौल?

Lok Sabha North Central Mumbai Constituency: उत्तर मध्य मुंबईमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचं प्राबळ्य नसून, मतदारांनी प्रत्येक पक्षाला कौल दिला आहे. यामुळे बहुरंगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातील लढत उत्कंठा वाढवणारी असेल.   

Updated: Apr 26, 2024, 04:23 PM IST
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? बहुरंगी मतदारसंघ कोणाला देणार कौल? title=

North Central Mumbai Constituency: सहा विधानसभा मतदारसंघ; शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस असे सर्वपक्षीय आमदार आणि त्यात मराठी, मुस्लीम, मारवाडी, गुजराती असा वेगवेगळ्या समाजातील मतदार असणारा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ अत्यंत बहुरंगी आहे. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचं प्राबळ्य राहिलं नसल्याने, तसा तो एखाद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात नाही. या मतदारसंघाने सर्व विचारांचे पक्ष स्विकारले आहेत. आता याच मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा विजय करणारा हा मतदारसंघ यावेळी कोणाला कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल. यानिमित्ताने या मतदारसंघाचा घेतलेला आढावा. 

आतापर्यंत पाच महिला नेत्यांना संधी

उत्तर मध्य मुंबईने आतापर्यंत पाच महिलांना मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून निवडलं आहे. यामध्ये रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत. त्यातच आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने अखेर वर्षा गायकवाड यांच्या रुपात महिला उमेदवाराला संधी दिली आहे. 

सर्वपक्षीय आमदार
 

खरं तर वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ हवा होता. कारण तिथे त्यांचा धारावी मतदारसंघ येतो. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे पूर्व व पश्चिम, विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला आणि कलिना या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वांद्रे पूर्व येथे झिशान सिद्दीकी, वांद्रे पश्चिम येथे आशिष शेलार, विलेपार्ल्यात पराग अळवणी, चांदिवलीत दिलीप लांडे, कुर्ल्यात मंगेश कुडाळकर आणि कलिनात संजय पोतनिस आमदार आहेत. म्हणजेच वांद्रे पूर्व वगळता इतर मतदारसंघात काँग्रेसचं प्राबळ्य कमी आहे. 

संमिश्र वस्ती

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ तसा बहुरंगी आहे. याचं कारण येथे वेगवेगळ्या धर्म, समाज आणि आर्थिक स्तरातील लोकांचं वास्तव्य आहे. एका बाजूला बीकेसासारखं मोठं आर्थिक केंद्र आणि दुसरीकडे झोपडपट्टीचं साम्राज्य अशी मोठी तफावत या मतदारसंघात पाहायला मिळते.  

या मतदारसंघात मध्यमवर्गीय, उद्योजक, फिल्म स्टार असे वेगवेगळे मतदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे येथे मराठीसह उत्तर भारतीय, मुस्लीम, दलित, गुजराती, मारवाडी असे अनेक लोक आहेत. येथे सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार आहेत. तसंच सुमारे पावणे तीन लाख उत्तर भारतीय तर दोन लाखांच्या आसपास गुजराती, मारवाडी मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षासमोर मतदारांना आकर्षित करताना मोठं आव्हान असतं. संमिश्र वस्ती असल्याने त्यांना सर्वसमावेश प्रचार करण्याशिवाय पर्याय नसतो. 

वडिलांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी

या मतदारसंघातून 1984 मध्ये काँग्रेसचे शरद दिघे निवडून आले होते. तसंच 1989 साली सेनेचे विद्याधर गोखलेंनी बाजी मारली होती. 1996 मध्ये शिवसेनेचे नारायण आठवलेंचा विजय झाला आणि 1998 साली रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले खासदार झाले. 1999 साली शिवसेनेचे मनोहर जोशींनी विजय मिळवला होती. पण यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे जायंट किलर ठरले होते. आता त्यांच्याच कन्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

मागील निवडणुकीत काय चित्र होतं?

2009 मध्ये सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त निवडणूक जिंकत लोकसभेत पोहोचल्या होत्या. पण यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असल्याने पूनम महाजन यांना त्याचा फायदा झाला होता. 2019 च्या निवडणुकीत पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार 672 मतं मिळाली होती. तुलनेत  प्रिया दत्त यांना 3 लाख 56 हजार 667 मतं मिळाली.

महाराष्ट्रात मागील निवडणुकीच्या तुलनेत राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली असून आता महाविकास आघाडी आणि महायुती निर्माण झाली आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीवर होऊ शकतो. कारण मतदान करताना मतदारांसमोर महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार असे पर्याय असणार आहेत. त्यात वांद्रे पूर्व, चांदिवली. कुर्ला आणि कलिना हे चार मतदारसंघ काँग्रेस किंवा महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहेत तर वांद्रे पश्चिम, विलेपार्ले या दोन मतदारसंघांमध्ये भाजपाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल हे पाहावं लागेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x