व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीतच; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. 

Updated: Jun 26, 2020, 12:45 PM IST
व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीतच; मुख्यमंत्र्यांची घोषणा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील व्यावसायिक (professional)  आणि बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या  निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील  बिगर व्यावसायिक (non-professional)  अभ्यासक्रमांच्या यादीत बीए, बीकॉम आणि बीएससी यांचा समावेश आहे. तर कायदा, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), फार्मसी हे अभ्यासक्रम व्यावसायिक (professional)  यादीत मोडतात. 

यासंदर्भात या अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय शिखर संस्थांना सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या संस्थांचा समावेश आहे.राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या संस्थांनी शिक्कामोर्तब करावं आणि तसे आपल्या अखत्यारीतील विद्यापीठांना कळवावं, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रात केली आहे.