Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यानंतर सरकारने याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. तर शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Bollywood Life | Updated: Mar 13, 2023, 06:06 PM IST
Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा title=

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा मॉर्फिंग केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही (Assembly) उमटले. भाजप आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी या प्रकरणामागच्या मास्टरमाईंडला शोधून काढा अशी मागणी केली. आता सरकारने मोठी घोषणा केली आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारने एसआयटीची (SIT) घोषणा केली आहे. कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली. 

दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) भेट घेतली. काही बाईकस्वार पाठलाग करत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आज सकाळी दादर शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानापासून कार्यालयात जात असताना सिद्धिविनायक मंदिर परिसरात एका बाईकस्वार कारजवळ आला. माझ्या सुरक्षेसाठी पोलीसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ते पुढे आले. पोलीस पाहाताच बाईकस्वार पसार झाला, असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती दिल्याचंही शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर आरोप केला आहे. ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आलं आहे. यावरुन या गोष्टी कोणत्या थराला गेल्या आहेत, हे कळतं, असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. 

कोण आहे साईनाथ दुर्गे?
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ (Sheetal Mahtre Viral Video) प्रकरणी साईनाथ दुर्गेला (Sainath Durge) अटक करण्यात आली आहे. साईनाथ दुर्गे हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसंच तो सघ्या युवासेना कार्यकारिणीची सदस्य आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विमानतळावरुन साईनाथ दुर्गेला ताब्यात घेतलं. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.  दरम्यान, हे दबावाचं राजकारण असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आता आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्याला घेराव घातला.