Samruddhi Mahamarg Crack : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samrudhi Mahamarga) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण अवघं एक वर्ष झालं नाही तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आलं आहे. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्गाच्या वरुन जाणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय.. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील (Thane) ही घटना आहे..मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गालगतच्या गावांसाठी अंडरपास तसंच ओव्हरब्रिज बांधण्यात आलेत.. यातील शेरे-बावघर-शेंद्रूण या गावांना जोडणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय.. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्ग अद्याप वाहतुकीसाठी सुरु झालेला नाहीये. मात्र त्याआधीच महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
समृध्दी महामार्गात झालेल्या भ्रष्टाचारामुळेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्तेच या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या 18 हजार कोटी रुपयांच्या अटल सेतूलाही भेगा पडल्याचे आम्ही उघड केले होते, समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा यातून मोदींची गॅरंटी किती तकलादू आहे हे स्पष्ट झाले. भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघत आहेत परंतु महायुती सरकारला जराही लाज शरम वाटत नाही, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. तर गुजरात निवडणुकीत भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला असा आरोप रोहित पवारांनी केलाय.
भेगा बुजवण्याचं काम सुरु
समृद्धीच्या उद्घाटनाच्या वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या अशा पद्धतीची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर तातडीना आता या भेगा बुजवण्याचा काम सुरू झालं आहे. जवळपास सात ते आठ जणांची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि या भेगा बुजवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे, महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून या भेगा होत्या मात्र कुणीही बुजवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र बातमी दाखवताच भेगा बुजवण्याच्या कामाला वेग आलेला आहे