मुंबई : Maharashtra Crisis : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने जल्लोष साजरा केला. आज भाजपच्या कोअर टीमची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी सी.टी रवी मुंबईत येण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटीलांसह भाजप नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे. तर उद्याच फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन होणे निश्चित मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस 1 जुलै (शुक्रवार) रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होतील.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.