राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा

राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.  

Updated: Apr 29, 2020, 06:23 AM IST
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा title=

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात, अशा शिफारशीचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव राज्यपालांनी मंजूर केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची विधान परिषदेच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी लक्षवेधी ठरत आहे. 

दरम्यान काल रात्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या फोनवरून बोलणे झाल्याचंही समजते आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष असणार आहे. राज्यपाल नव्या प्रस्तावर आता सही करणार का, याचीही उत्सुकता लागली आहे. तसेच राज्यात कोरोनाचे संकट असताना मुख्यमंत्री ठाकरे हे एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास राजकीय नवे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने  काल  नवा प्रस्ताव राज्यपालांना सादर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्याबाबतचं नवे पत्र सादर केले. राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत राज्यपालांकडे नवं पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे पत्र घेऊन महाविकास आघाडीचे नेते  राज्यपालांना भेटले. याबाबत राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागले आहे.