मुंबई: सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडी अद्याप थांबलेल्या नाहीत. यामध्ये आता आणखीन एका बातमीची भर पडली आहे. त्यानुसार आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक खाती मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी महाविकासआघाडीच्या चर्चेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह सर्वाधिक १६ खाती मिळणार असे ठरले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १४ मंत्रिपदे मिळतील, असे सांगितले जात होते.
मात्र, सत्तावाटपाचा हा फॉर्म्युला आता पूर्णपणे बदलल्याचे समोर आले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला काँग्रेसला सर्वाधिक १६ खाती मिळतील. त्यापाठोपाठ शिवसेना १५ आणि काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळतील, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दबावामुळे सत्तावाटपाचे सूत्र बदलण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकचे कॅबिनेट मंत्रीपद मिळेल.
नवीन फॉर्म्युला
शिवसेना - मुख्यमंत्री +१५ मंत्रिपद
(११ कॅबिनेट + ४ राज्यमंत्री)
राष्ट्रवादी १६
१२ कॅबिनेट+ ४ राज्यमंत्री
यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश आहे.
काँग्रेस १३
९ कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती - एकनाथ खडसे
२८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी दोन नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप होणे अपेक्षित होते. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते खाते द्यायचे, हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकहाती सर्व निर्णय घेण्याची कसरत करावी लागत आहे.
सोलापुरात महापौर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा पाठिंबा
मात्र, सत्तावाटपाचा फॉर्म्युला बदलल्याने महाविकासआघाडीत अंतर्गत कुरबुरी सुरु होणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपात वरचष्मा राखणे, हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. परंतु, आता शरद पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेला नमते घ्यावे लागणार का आणि तसे झाल्यास काय पडसाद उमटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.