महायुतीतला सत्तासंघर्ष शिगेला, भाजप-सेनेची बैठक रद्द

भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेबाबतची बैठक रद्द झाली आहे. 

Updated: Oct 29, 2019, 04:31 PM IST
महायुतीतला सत्तासंघर्ष शिगेला, भाजप-सेनेची बैठक रद्द title=

मुंबई : भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, यानंतर युतीतील संबंध ताणले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि सुभाष देसाई या बैठकीला जाणार होते, पण आता शिवसेनेकडून बैठकीला कोणीही जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा खुलासा होण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने मांडले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीवेळी युती झाली त्यावेळी सत्तेत समसमान वाटा असं मुख्यमंत्री म्हणाल्याचे सांगत, राऊत यांनी तेव्हाची एक व्हिडिओ क्लिप दाखवली.

भाजपने सामनामधून लिहिण्यात येणाऱ्या लेखांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लिहून दाखवा, असं आव्हान भाजपने केलं होतं, त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीविराेधात तेव्हा लिहले म्हणून २०१४ ला युतीची सत्ता आली, हे लक्षात ठेवा.  माझ्यावर फणा काढायची गरज नाही, पक्षाची भूमिका मी मांडत आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात कुण्या दुष्यंतांचे वडील जेलमध्ये नाहीत असा टोला राऊतांनी भाजपाला लगावलाय. भाजपा कुठपर्यंत ताणणार हेच आता बघायचंय असं आव्हान त्यांनी दिले आहे.