मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे बिगुल वाजण्याआधीच सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. देशभरात पक्षअध्यक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षजोडणीचे काम सुरू झाले आहे. राज्यात भाजपा सोबत युती होईल की नाही हे स्पष्ट झाले नसताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या लोकसभा मतदार संघाचा आज आढावा घेतला. मुंबईतल्या लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या नावाला कडाडून विरोध केला.
मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी युती झाली तर किरीट सौमय्या यांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. किरीट सौमय्या हेच युतीचे उमेदवार झाले तर शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाहीत असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
किरीट सौमय्या याच्या विरोधात सर्व शिवसैनिक काम करणार असल्याचे शिवसैनिकांनी उघडपण जाहीर केले आहे. एवढंच नव्हे तर पक्षाने कारवाई केली तरी सर्व शिवसैनिक किरीट सौमय्या यांच्या विरोधातच काम करणार असे शिवसैनिकांचे ठाम मत आहे. त्यामुळे किरीट सौमय्या यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.