मुंबई : मुंबईसह राज्यातल्या १७ मतदारसंघात सोमवारी मतदान आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारची मतदानाची सुट्टी घेऊन मतदार सुट्टी साजरी करण्यासाठी निघाले आहेत, असे चित्र दिसून येत आहे. मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.
सोमवारी मतदान आहे आणि मुंबई- गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्यांची ही गर्दी झालीय. शाळांच्या सुट्ट्या आणि त्यात शनिवार रविवारला जोडून मिळालेल्या सोमवारची मतदानाची सुट्टी घेऊन अनेकजण गावाला निघालेत. तर काहींनी सहलीचेही बेत आखलेत. मतदानाचं काय यावर मात्र ते गोलमोल उत्तरं देत आहे.
गावाला आणि सहलीला जाणाऱ्या मतदारांचं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केलं. मुलुंड टोल नाक्यावर गावाला जाणाऱ्या मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केले. मतदार सुट्टीवर जाण्यामुळं राजकीय पक्षांनाही चिंता आहे. 'झी २४तास'च्या मुक्तचर्चा या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही भीती बोलून दाखवली होती.
तुमचे आमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून देण्याची हिच वेळ आहे. दोन दिवसांची सुट्टी कॅश करण्याच्या नादात ही संधी गमावू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.