लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. 

राजीव कासले | Updated: Apr 3, 2024, 06:07 PM IST
लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार title=

Loksabha 2024 : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस (Congress) पक्षाने घेतला, यातूनच काँग्रेस पक्षाने 5 न्याय आणि 25 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा संकल्प जाहीर केला असून राज्यात घरोघरी जाऊन हा संदेश पोहचवला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रचार समितीची बैठक
टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला माहिीत दिली.  'गॅरंटी' हा शब्दही राहुल गांधी यांनी आधी प्रचारात वापरला, कर्नाटक विधानभा निवडणुकीवेळी काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्यावर जनतेने विश्वास टाकला. सत्ता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. तसxच तेलंगणातील जनतेनेही काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास टाकला. आता देशभरातील जनतेसाठी काँग्रेसने 5 न्याय आणि 25 गॅरंटी दिल्या आहेत, 

शेतकऱ्यांना कर्जमाफी, एमएसपीचा कायदा, जीएसटीमुक्त शेती, तरुणांसाठी 30 लाख रिक्त जागा भरणे, शिक्षित तरुणांना प्रशिक्षण आणि वर्षाला 1 लाख रुपये, गरिब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याची गॅरंटी देण्यात आली आहे. भाजपाचा अपप्रचार खोडून काढणे तसंच काँग्रेसच्या गॅरंटीचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.

भिवंडी, सांगली आणि मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आजही आग्रही आहे. यासाठी सामोपचाराने व चर्चेतून मार्ग काढला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच इंडिया आघाडीचा निर्धार आहे त्यासाठी सर्व मित्र पक्षांनी काम केले पाहिजे. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतली असून इंडिया आघाडीवर जनतेचा विश्वास वाढलेला आहे असेही नाना पटोले म्हणाले.        

संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, माजी खासदार संजय निरुपम यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते पण त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले. 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, पब्लिसिटी कमिटीचे अध्यक्ष विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज बंटी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान,  माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.