लॉकडाऊन । आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी, फ्री क्रमांक

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.  

Updated: May 13, 2020, 10:15 AM IST
लॉकडाऊन । आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी, फ्री क्रमांक title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी १९२१ या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी सुरु करण्यात आली आहे.  राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरु झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. 

ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उलप्ध असणार असून  रविवारी ही सेवा उपलब्ध नसेल. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आला आहे. 

गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. आता मात्र राज्यभर सर्वत्र सेवा सुरु झाली असून आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्लामसलत करु शकतो. थेट व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.

कशी वापराल ही सेवा ?

- नोंदणी करुन टोकन घेणे- त्यासाठी मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.

- लॉगइन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकच्या आधारे लॉगइन करता येईल.

- वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टिव्ह) होईल. त्यानंतर व्हिडिओ कॉल करता येईल.

- तुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.

 आरोग्य विषयक सूचनेसाठी टोल फ्री क्रमांक 

 नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी १९२१ या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला १९२१ क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. कॉल बंद झाल्यावर त्यास या सेवेच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. त्यास आरोग्य सेतू ॲपशी संबंधित आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येईल. दिलेल्या उत्तराच्या आधारे लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून आपल्या प्रकृतीच्या सद्यस्थिती विषयी माहिती देण्यात येईल. नंतर देखील नागरिकांना त्यांच्या प्रकृती विषयी संदेश देण्यात येतील.