छोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक

Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.

Pravin Dabholkar | Updated: Dec 12, 2023, 03:35 PM IST
छोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक title=

Little Durgvir Trekking: प्रत्येकाला लहानपणापासून काहीनाकाही आवड असते. राजगुरुनगर येथे राहणारा अवघ्या 4 वर्षांचा आयांश पराग ढवळे अनोख्या पद्धतीने आपली आवड पूर्ण करत आहे. या चिमुरड्याने  किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी , उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात. आयांशचा मोठा भाऊ हिमांक याने आत्तापर्यंत 129 किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. तसेच  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर “कळसूबाई शिखर वयाच्या सहाव्या वर्षी सर केले आहे.

आयांशने यावर्षी आपलाच भाऊ हिमांक याने सातव्या वर्षी 101 किल्ल्यांवर केलेल्या ट्रेकिंगचा रेकॉर्ड मोडून तो महाराष्ट्रातील 100 किल्ल्यांवर चढाई करणारा "छोटा दुर्गवीर" बनला आहे.

राजगुरुनगर येथे व्यवसायाने डॉक्टर असलेले मारुती ढवळे आणि मंदाकिनी ढवळे यांनी एकूण 250 किल्ले आणि 1 हजारपेक्षा जास्त ट्रेक केले आहेत. त्यांच्या प्रेरणेने आयांशने आपल्या कुटुंबासमवेत आठ दिवसात 43 जलदुर्ग,पाच दिवसात सोलापूर, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस भुईकोट किल्ले, चार दिवसात सातारा, कराड मधील चौदा गिरिदुर्गांवर ट्रेकिंग करत आपल्या नावे अनोखे विक्रम केले आहेत.

"बालदुर्ग भ्रमंतीकार" पुरस्कार पटकावणारे तसेच "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नाव नोंदविणारे आयांश आणि हिमांक ही दुर्गवेड्या भावांची महाराष्ट्रातील एकमेव जोडी आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व किल्ले करण्याचा तसेच हिमालयीन ट्रेक करण्याचा दोघांचाही मानस आहे. किल्ल्यांची माहिती गोळा करणे, तेथील शिल्पांचे निरीक्षण करणे, ऐतिहासिक पुस्तके वाचणे, ट्रेकिंगची तयारी करणे यामध्ये त्यांना विशेष आवड आहे. 

ट्रेकिंग करताना आपण जी गोष्ट ठरवतो ती पूर्णत्वास नेणे, जिद्द,चिकाटी, संयम, थोर राष्ट्रपुरुषांबद्दल आदर, देशप्रेम या भावना वाढीस लागतात. "इतिहास पुस्तके वाचून समजत नसतो, तर तो निरीक्षणातूनच समजतो" असे मत आयांशचे वडील पराग आणि आई धनश्री यांनी व्यक्त केले आहे. 

मुलांना मोबाईल खेळायला न देता आम्ही नियमितपणे त्यांना निसर्गात नेतो आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, इतिहास यांची माहिती करून देतो. सुजाण पालक म्हणून आपण मुलांना हा ऐतिहासिक वारसा देणं हे आपलं कर्तव्य असल्याचे ते सांगतात.