मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवासांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आलं आहे. मतदार यादीतील घोळ टाळण्यासंदर्भात काही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. यानुसार मतदारांची माहिती आधार कार्डशी लिंक करण्यात यावी. त्यामुळे दुबार मतदारांची नावं वगळण्यास मदत होणार असून निवडणूक यंत्रणेचा वेळ वाचू शकेल अशी सुचना करण्यात आली आहे.
नुकताच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात ही मागणी करण्यात आली होती. बोगस मतदानाची संख्या वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मतदार यादी आधारशी लिंक करा अशी मागणी केली होती. जितेंद्र अव्हाड यांच्या या मागणी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिले होते.
आपण याविषयाचा संपूर्ण अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतदार यादी आधारशी लिंक करण्याची विनंती करू. त्यानुसार एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत अधिक परदर्शकता येईल. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे हे पत्र लिहलं आहे, आता निवडणूक आयोग त्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.